अहमदाबाद : वृत्तसंस्था
गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी खासगी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. 17 जण गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. ही बस महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे ४८ भाविकांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, यात्रेकरू मध्य प्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील होते.
23 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी, गुना आणि अशोकनगर जिल्ह्यातील भाविकांचा एक समूह धार्मिक यात्रेला निघाला होता. हे लोक उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जात होते. एकूण चार बसमधून भाविक प्रवास करणाऱ्या एका बसला अपघात झाला.