यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील साकळी येथील हजरत सजन शहावली बाबाच्या दर्गाहजवळ यावल शहरातील २१ वर्षीय तरुणावर मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी हल्ला चढवला. यामध्ये त्याच्यावर चाकूने जबर वार केले असून हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ जळगाव रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात साकळी येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, साकळी गावात हजरत सजन शहावली बाबा दर्गाह असून या दर्गाहजवळ २६ जानेवारीला रात्री यात्रेनिमित्त शादाब खान गुलाब खान (वय २१, रा. बाबूजीपुरा, यावल) हा तरूण आला होता. तेथे मागील भांडणाच्या कारणावरून नईम मन्यार अब्दुल हक, जनलाल नईम मन्यार, अदनान नामक तरूण, अकीब शेख सुलतान व शादाब शेख शाहरुख या पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात चाकूने शादाब खान याच्या पोटावर वार केले. तर फायटरने त्याला मारले. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला गंभीर अवस्थेत जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात त्या पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.