जामनेर : प्रतिनिधी
दहा हजार रुपये द्या… त्याचे एक लाख करून देतो, अशी बतावणी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जांभूळ, ता. जामनेर शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. प्रकाश पीतांबर जाधव (५१, रा. सामोडे, ता. साक्री, जि. धुळे) आणि मोहम्मद समीर अब्दुल करीम (५९, रा. बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्या दोन जणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील जांभूळ शिवारात जीवन खैरे (रा. चिंचखेडा) यांचे फार्म हाऊस आहे. याठिकाणी शुक्रवारी दुपारी वरील दोन जण आले. त्यांनी खैरे यांना दहा हजाराच्या मोबदल्यात एक लाख करून देतो… असे सांगितले. यावर खैरे यांनी या दोघांकडे ११ हजार रुपयांची रक्कम दिली. वरील दोघांनी हे पैसे पाण्याच्या बादलीत टाकले. सोबत केमिकलही टाकले. लाईट बंद करून खैरेची नजर चुकवून पैसे बादलीतून काढून घेतले. यादरम्यान महम्मद समीर याने खैरे यांना एका पांढऱ्या रुमालात नोटांचे बंडल दिले, आणि दुसऱ्या दिवशी रुमाल उघडा म्हणजे एक लाख झालेले असतील, असे सांगितले. खैरेंनी तातडीने रुमाल उघडला तर त्यात नोटांचे आकाराचे कागदाचे पांढरे बंडल निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खैरे यांनी पोलिसांना ही घटना कळवली.
पोलिस निरीक्षक सचिन सानप व उपनिरीक्षक भारत दाते हे काही वेळताच तिथे पोहचले. त्यांनी संबंधितांना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी जीवन खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना जामनेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांकडून चारचाकी वाहनासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.