मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत. तसेच त्या दोघातील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनातील असलेली अनेक जाळमटे दूर होतील, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यासंदर्भात लवकरच काही प्रकरणे आपण समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत. आमच्या दृष्टिकोनात अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस यांची महाराष्ट्र संदर्भातली भूमिका ही चांगली नाही. अशा लोकांचे राज ठाकरे राजकीय मित्र आहेत. ते एकमेकांना मदत करतात. आता भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटातील या मित्राने ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएममध्ये पडलेली मते कुठेतरी गायब झाली, त्याच्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे. थोडक्यात हा घोटाळा आहे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घ्यायला हवी आणि फडणवीस काय उत्तर देतील हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दोघांमधील संवाद लाईव्ह दाखवायला पाहिजे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.