भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव येथे मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने पायी चालणाऱ्या मजुरास बसच्या मागील भागाची जबर धडक बसल्याने ५० प्रौढ गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बोहर्डी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर घडली. या प्रकरणी बसचालकाविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर कडून भुसावळकडे जाणारी एस.टी. बस (एम- २०, बीएल- ०७२०) ही घेऊन चालक दिलीप जीवराम नागरुत (वय ५५रा. मेसांगे, ता. मुक्ताईननगर) हे महामार्गावरुन सर्विस रोडकडे वळण घेत होते. याचवेळी रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या अनिल अंबोरे यांना एस.टी. बसच्या मागील भागाची जबर धडक बसली.
या अपघातात अनिल अंबोरे हे रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली आहे. या अपघातात जखमी असलेल्या अनिल अंबोरे यांना वरणगावातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत बोहर्डी येथील पोलीस पाटील साहेबराव शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन वरणगाव पोलिसांत बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास यासिन पिंजारी, प्रमोद कंखरे करत आहेत.