जळगाव : प्रतिनिधी
कंपनीच्या कामानिमित्त हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेले अतुल यशवंत महाजन (३८, रा. पंचवटी, जि. नाशिक) यांचे एटीएम कार्ड, मोबाइल एका जणाने चोरून नेला. त्यानंतर एटीएममधून एक लाख १७ हजार रुपये काढण्यात आले. ही चोरी हॉटेलमध्ये शेजारील बेडवर असलेल्याने केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना ३० जानेवारी रोजी रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी के. राघवेंद्र (रा. कर्नाटक) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी येथील रहिवासी असलेले अतुल महाजन हे एका अमेरिकन कंपनीमध्ये नोकरीला असून कंपनीच्या सेल्सचे नागपूर व नाशिक विभागाचे ते काम पाहतात. २९ जानेवारी रोजी ते जळगावात कामानिमित्त आले व रेल्वेस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. त्यावेळी रात्रीतून त्यांचा मोबाइल व खिशातील पाकीट चोरीला गेले. सकाळी हॉटेल व्यवस्थापकाला याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता महाजन यांच्या बेडच्या शेजारील बेडवरील एकाने ही चोरी केल्याचे दिसले. शहर पोलिसात के. राधवेंद्र (रा. कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
खिशातील पाकिटामधील एटीएम, क्रेडिट कार्ड चोरीला गेल्याने महाजन यांनी बँकेत जाऊन कार्ड बंद करण्याची प्रक्रिया केली, मात्र त्यापूर्वीच पहाटे ५:३० वाजता एटीएममधून एक लाख १५ हजार रुपये काढलेले होते. खात्यात असलेली रक्कम तर काढलीच शिवाय महाजन यांच्या एका मित्राकडून काहीतरी बहाणा करून यूपीआयवर पैसे मागविले व तेदेखील काढण्यात आले होते.