पारोळा : प्रतिनिधी
मुलीचे दागिने आणि रोख रक्कम परत देण्यासाठी जळगावला जाणाऱ्या शिंपी दाम्पत्याच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबवले आहेत. ही घटना दि.२९ रोजी पारोळा बस स्थानकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथील नगरपालिकेचे सेवानिवृत्त ग्रंथपाल भटू सोनू शिंपी, रा. गावहोळी चौक, पारोळा यांच्याकडे गेल्या काही दिवसांपासून त्यांची जळगाव येथील मुलगी व जावयाने ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचा तुकडा आणि तीन लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम ठेवायला दिली होती. ही रक्कम त्यांनी आपल्या पारोळा येथील बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली होती परंत मलीला या रकमेची गरज असल्याने ती त्यांनी मागितली त्याप्रमाणे लॉकरमधून काढून दि.२९ रोजी शिंपी आपल्या पत्नीसह रक्कम परत देण्यासाठी जळगाव येथे जाण्यासाठी निघाले.
पारोळा बसस्थानकात चार वाजेच्या सुमारास मालेगाव- मुक्ताईनगर बसमध्ये चढताना कोणीतरी अज्ञात चोट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या जीन्सच्या कापडी पिशवीला ब्लेड मारून पिशवीतील पैसे व रोख रकमेचा बॉक्स लंपास केला. त्यात एकूण सुमारे सात लाख सात हजार रुपयांचे मौल्यवान वस्तू व रोख रुपये होते. याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस बसस्थानकात असतानाच ही घटना घडली.