जळगाव : प्रतिनिधी
मोहाडी-धानोरा रस्त्यावर उतरलेल्या महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्तिक पथकाने वाळूची वाहतूक करणाऱ्या ८ वाहनांना जप्त केले आहे. या पथकाने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धानोऱ्यातील गिरणा पात्रात कारवाई सुरु केल्यानंतर सर्वच वाहने ताब्यात घेतली. या कारवाईत ४ ट्रॅक्टर, २ डंपर, प्रत्येकी एक व्हायवासह ट्रक वाळूसह जप्त करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी विनय गोसावी, डी.वाय.एस.पी. संदीप गावीत, तहसीलदार शीतल राजपूत, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड यांनी महसूल, तालुका पोलीस स्टेशन व शीघ्रकृती दलाचे जवानांचे एक पथक नियुक्त केले. त्यानुसार या पथकाने धानोरा-मोहाडी रस्त्यावर गस्त सुरु केली. त्यात वाहनांवर कारवाई केली गेली.
या कारवाई पथकात म्हसावद मंडळाधिकारी अजिंक्य आंधळे, आसोद्याचे रमेश वंजारी, जवखेडा तलाठी चंद्रकांत ठाणगे, प्रकाश जामोदकर, दिनेश अहिरराव, सुरेश महाजन, पोलीस अंमलदार अनिल फेगडे, संजय भालेराव, दिनेश पाटील, धनराज पाटील, दीपक चौधरी, निंबा भदाणे, बापू कोळी, तुषार जोशी, तेजस पाटील व धानोरा पोलीस पाटील या कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान कारवाई केलेल्या भागात मोठ्या प्रमाणात वाळू चोरून नेली जात असल्याचा अनेक तक्रारी होत्या.
दरम्यान, या पथकाने धानोऱ्यातील गिरणा नदीच्या पात्रातून काही वाहने जप्त केली. तसेच उपसा केलेल्या वाळूचा बेकायदा साठा देखील कारवाईत ताब्यात घेण्यात आला. कारवाईच्या नंतर हस्तगत केलेल्या वाहनांना घेऊन पथक जळगाव शहरातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले. वाळूमाफियांच्या पंटरांनी मध्यवर्ती कार्यालय परिसरात गर्दी केली. मध्यरात्री रस्त्यावर झालेली गर्दी पाहून अनेकांना धक्का बसला.