जळगाव : प्रतिनिधी
शतपावली करत असताना नंदा विकास कोळी (३७, रा. दशरथ नगर) यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनपोत दुचाकीस्वाराने ओढून नेत तो पसार झाला. चोरटा हा समोरून आला व दुचाकीचा वेग कमी करीत त्याने काही क्षणातच सोनपोत ओढली. ही घटना २५ रोजी जुना खेडी रोड परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्युटीपार्लरचा व्यवसाय असलेल्या नंदा कोळी या मैत्रिणीसह रात्री शतपावली करीत असताना जुना खेडी रोडवर समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून एक जण आला व त्याने कोळी यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची सोनपोत तोडून नेली.
चोरट्याने सोनपोत ज्या ठिकाणाहून लांबविली त्या ठिकाणी खड्डा होता. चोरटा जवळ आल्यानंतर त्याने दुचाकीचा वेग कमी करीत सोनपोतच लांबविली. त्या ठिकाणी अंधारही असल्याने सोनपोत तोडताना त्याने हात पुढे केल्याचे लक्षातही आले नाही, असे या महिलेने सांगितले कोळी यांनी आरडाओरड केल्याने दोन तरुणांनी चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.