जळगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीशी मैत्री करून नंतर तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला इंदूरसह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तिच्यावर एकाने बलात्कार केला. हा प्रकार जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडला. या प्रकरणी नितेश धनराज राठोड याच्यासह त्याला मदत करणारे तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय मुलीशी नितेश राठोड (रा. धानवड, ता. जळगाव) याने मैत्री करून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले. त्यानंतर तिचा एकटीचा तसेच सोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत इंदूरमधील प्रीतमपूर भागासह शिरसोलीच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच तरुणीच्या आई-वडिलांना व तिला मारून टाकण्याची धमकी देत तो हा प्रकार करीत राहिला.
या प्रकरणी अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नितेश राठोड याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुलीला पळवून नेण्यास मदत करणारे गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भावलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण (सर्व रा. धानवड, ता. जळगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. माधुरी बोरसे करीत आहेत.