प्रयागराज : वृत्तसंस्था
देशातील उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. देशभरासह परदेशातून देखील असंख्य भाविक रोज प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान आज ४६ लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणीत पवित्र स्थान केले. तर १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात १३. २१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
महाकुंभात केवळ सामान्य लोकच नाही तर मोठे राजकीय व्यक्तिमत्व देखील सहभागी होत आहेत. गृहमंत्री अमित शाह आज (दि.२७) महाकुंभ मेळ्यासह, त्रिवेणी संगम स्नान तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. त्यापूर्वी शहा यांनी उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी कुंभमेळा आखाड्यातील संत आणि ऋषींचीही भेट घेऊन संवाद साधला.
कुंभमेळादरम्यान अमित शाह यांनी शृंगेरीचे शंकराचार्य भारती तीर्थ महाराज, यासोबतच पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज, द्वारकेचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतील. तसेच शहा यांनी कुंभमेळ्यातील जूना आखाड्याचे महंत अवधेशानंद गिरी महाराज, गुरु शरणानंद जी महाराज आणि गोविंद गिरी जी महाराजांनाही भेटतील असे वृत्त समोर आले आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीतील प्रमुख नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी (दि.२७) प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले होते. अखिलेश यांनी पवित्र त्रिवेणी संगमात ११ वेळा डुबक्या मारल्याचे वृत्त देखील समोर आले होते. १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू झालेला महाकुंभमेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २२ जानेवारी रोजी महाकुंभात पोहोचले होते आणि त्यांनी कॅबिनेट मंत्र्यांसह पवित्र स्नान केले होते. स्नानापूर्वी, योगी मंत्रिमंडळाने त्रिवेणी संकुलात बैठक घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, पहिल्यांदाच संपूर्ण मंत्रिमंडळ महाकुंभात उपस्थित आहे. तत्पूर्वी, १८ जानेवारी रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संगम किनाऱ्यावर पोहोचून डुबकी मारली.