चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावद येथे कारच्या धडकेत दीड वर्षाची प्रियांशी संदीप पाटील (रा. अडावद) ही मुलगी ठार झाल्याची घटना अडावद येथील ग्रामपंचायतीच्या जवळ २४ रोजी दुपारी १ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच सपोनि प्रमोद वाघ, भरत नाईक, सतीष भोई, ज्ञानेश्वर सपकाळे, विनोद धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची आई सुवर्णा संदीप पाटील ह्या दुपारी १ वाजेच्या सुमारास घरासमोरील दुकानावर रस्ता ओलांडून ताक घेण्यासाठी जात असताना पाठीमागे मुलगी प्रियांशी ही येत होती. त्याचवेळी चारचाकी क्रमांक एम.एच. ३९ जे. ७४२४ ने मुलीला धडक दिली. त्यात मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक पंकज अरुण धनगर (रा. कमळगाव ता. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहेत.