जळगाव : प्रतिनिधी
मॉर्निंग वॉक केल्यानंतर कारमध्ये बसल्यावर कारमालकाला जळण्याचा वास येऊन काही वेळातच कारने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी (२४ जानेवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास लांडोरखोरी उद्यानानजीक घडली. कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने यात कारमालकाला कोणतीही इजा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगर परिसरातील गुरमीर सिंग हे त्यांची कार (क्र. एमएच १९ बीयू ३००१) लांडोरखोरी उद्यानाजवळ लावून आत फिरायला गेले होते. फिरून झाल्यानंतर ते कारमध्ये बसले व त्यांना काहीतरी जळका वास आला व सुरुवातीला धूर निघाला. त्यावेळी सिंग हे खाली उतरले आणि काही क्षणांत कारने पेट घेतला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या एका बंबद्वारे आग विझविली. या घटनेत कार पूर्णपणे जळाली असून, केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. अग्निशमन विभागाचे देवीदास सुरवाडे, इकबाल तडवी, महेश पाटील, योगेश पाटील यांनी आग विझविण्यासाठी मदत केली.



