पाचोरा : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक देत चिरडले. एका पाणीपुरीच्या गाडीला धडक देत त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दि. २३ रोजी रात्री ९ वाजता घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून गेलेल्या महामार्गावर आशीर्वाद हॉलसमोर नाशिकहून भुसावळकडे राख भरण्यासाठी जात असलेल्या भरधाव डंपर (एमएच १५/एचझेड८८७९) ने त्याच मार्गावरून पुढे जात असलेल्या दुचाकीस्वार हिरालाल काशिनाथ साळवे (५८, गाडगेबाबा नगर, पाचोरा) याला मागून जोरदार धडक दिली. पुढे पाणीपुरीची गाडी घेऊन जात असलेल्या एका परप्रांतीयास या डंपरने धडक देत त्यास जखमी केले. डंपरचालक पवनकुमार महातो (३७, कडोरमा, झारखंड) हा दारूच्या नशेत वाहन चालवत होता. लोकांनी चालकास अडवून त्यास मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले.