मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे भक्ष्याचा पाठलाग करताना रात्रीच्या वेळी शेतातील विहिरीत पडून बिबट्या गतप्राण झाल्याची घटना बुधवारी भोटा येथे उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भोटा येथील रायबा तुळशीराम मोरे यांच्या गट क्रमांक ८१ मध्ये असलेल्या विहिरीत बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती सकाळी वन विभागाला मिळाली. वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अक्षय मोरे, स्वप्निल गोसावी, सुधाकर कोळी उमेश तायडे, योगेश बोरसे, महेंद्र पुरकर, पवन टेळे, गौतम मोरे, रसूल तडवी, राजू खिरडकर, विशाल खिरडकर, रमेश खिरडकर, अशोक तायडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन माहितीची शहानिशा केली असता विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ मृत बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढले.
त्यानंतर बिबट्याचा मृतदेह कुन्हा येथील कार्यालयात आणण्यात आला. सहायक वनसंरक्षक यु. एम. बिराजदार, पी. एस. साळुंखे, विवेक देसाई यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी मनोज पाटील, डॉ. प्रशांत लोंढे यांच्या पथकाने मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा बिबट्या अंदाजे तीन ते साडेतीन वर्षांचा असावा तसेच शिकारीचा पाठलाग करत असताना रात्रीच्या अंधारात तो विहिरीत पडला असावा असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.