मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार आल्यापासून काहीना काही प्रकरणाने अडचणीत येत असतांना विरोधक महाविकास आघाडीतील ठाकरे गट आक्रमक होत सत्ताधाऱ्यावर हल्लबोल करीत आहे. आज देखील अक्षय शिंदे प्रकरणी ठाकरे गटाने सरकारला धारेवर धरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत? अक्षय शिंदेच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले. अक्षय शिंदेप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही? फडणवीस, लोकांच्या मनात हा प्रश्न कायम सळसळत राहील. देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला! असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून फडणवीसांवर टीका केली आहे.
दैनिक सामना मधील अग्रलेख देखील वाचा…
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण देशभरात गाजले होते. संघ परिवाराचे लोक चालवत असलेल्या शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. संस्था चालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. संस्था चालक सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. दुसरे असे की, पीडित मुलीच्या आईची तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते व ती माऊली वणवण भटकत राहिली. बदलापूरचे लोक रस्त्यावर उतरले व दंगल पेटली तेव्हा गुन्हा दाखल झाला व संस्थेचा शिपाई अक्षय शिंदे यास अटक केली. अक्षय शिंदे याच्यासोबत आणखी आरोपी असावेत व ते संस्थेशी संबंधित ‘बडे’ लोक असावेत असा लोकांचा संशय होता. त्यांचे काय झाले ते फडणवीसांना माहीत. अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून त्यास कठोर शिक्षा देता आली असती, पण विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व शिंदे-फडणवीस सरकारला ‘नाट्य’ घडवून खळबळ माजवायची होती. मतांचे गणित जमवायचे होते. त्यामुळे 23 सप्टेंबर 2024 ला तळोजा कारागृहातून न्यायालयात नेत असताना मुंब्रा बायपास येथे पोलिसांच्या व्हॅनमध्ये झालेल्या कथित चकमकीत अक्षय मारला गेला, अशी बोंब ठोकण्यात आली. या चकमकीवर तेव्हाच संशय निर्माण झाला होता, पण विषय लैंगिक शोषणाचा असल्याने सगळ्यांचीच तोंडे गप्प होती.
अक्षयच्या हातात बेड्या असताना व चार मजबूत पोलीस व्हॅनमध्ये असताना एक सडपातळ आरोपी दंड बेड्या घातलेल्या हातांनी पोलिसांचे रिव्हॉल्व्हर खेचून हल्ला करून पळून जाण्याचा उद्योग करील काय? पण हे बनावट कथानक रचले गेले. विरोधकांनी गदारोळ केल्यावर या प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी झाली. आता चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर झाला व अक्षय शिंदेचे एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका ठेवून पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. पाच पोलिसांना आरोपीच्या हत्येस जबाबदार धरले. हे सर्व पोलीस आता नोकरीतून बडतर्फ होतील व त्यांच्यावर खुनाचे खटले दाखल होतील. म्हणजे ते पोलीस व त्यांची कुटुंबे रस्त्यावरच आली. अक्षय शिंदेची हत्या होताच भाजप, शिंदे गट वगैरे लोकांनी त्याचा ‘इव्हेन्ट’ केला. कारण विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या व त्यांना मतांसाठी माहोल करायचा होता. अक्षय शिंदेच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांना जवळजवळ मिठ्याच मारल्या, पेढे वाटले, फटाके वाजले. अक्षय शिंदेला मारल्याचे श्रेय घेण्याची चढाओढ दोघांत लागली. ‘देवाभाऊचा न्याय’ अशी पोस्टर्स सर्वत्र झळकली व त्यात फडणवीस यांचा हाती बंदूक घेतलेला फोटो लावून त्यांना ‘सिंघम’ ठरवले. मात्र हे एन्काऊंटर आता चौकशी समितीनेच बनावट ठरविले आणि पाच पोलिसांना दोषी धरले, त्याचे काय करायचे?