जळगाव : प्रतिनिधी
शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये अवैध धंदेवाल्यांसह वाळू माफियांसोबत पोलिसांचे आर्थीक हितसबंध असल्याचे आरोप होत आहे. या घटनांची गंभीर दखल घेत जळगाव विभागातील पाच पोलीस ठाण्यांसह एलसीबी आणि पोलीस मुख्यालयातील अशा एकूण ९ जणांची चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरुपात पोलीस मुख्यालयात त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कालिंका माता मंदिरजावळ भरधाव वाळूच्या डंपरने चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली होती. यावेळी संतप्त जमावाने डंपर पेटवून देत पोलिसांवर वाळूमाफियांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता. शहरात घडणाऱ्या घटनांमध्ये संबंधीत पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालकांसोबत असलेल्या आर्थीक संबंधामुळे संपुर्ण पोलीस दलावर आरोप होत असल्याने त्याची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
अवैध धंदेचालकांसह वाळूमाफियांसोबत संबंध असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या संपुर्ण घटनांची गांर्भीय लक्षात घेत पोलीस अधीक्षकांनी जळगाव विभागातील एमआयडीसी, तालुका, शनिपेठ, रामानंद नगर, जिल्हापेठ, एलसीबी व शहर पोलीस ठाण्यातील ९ जणांना चौकशीसाठी तात्पुरत्या स्वरुपात त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एकाच वेळी ९ जणांची उचलबांगडी झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे.