जळगाव : प्रतिनिधी
चिंचोली शिवारात उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय संकुलाच्या (मेडीकल हब) बांधकामासाठी बिलाची रक्कम टीडीएस कपात न करता अदा करण्यात आल्याच्या संशयावरून आयकर विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मंगळवारी (२१ जानेवारी) आयकर विभागाचे नाशिक येथील पथक सकाळी नऊ वाजताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल झाले.
पथकाकडून दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात येऊन संध्याकाळी सातवाजेपर्यंत संपूर्ण झाडाझडती करण्यात आली. दरम्यान, आयकर विभागाचा हा नियमित सर्वे असल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
चिंचोली शिवारामध्ये वैद्यकीय संकुलाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या उभारणीसाठी केंद्र सरकारच्या एचईसीसी कंपनीला काम देण्यात आले आहे. बांधकामासाठी जवळपास १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून रक्कम अदा करताना काही बिलांवर १० टक्के, काही बिलांवर दोन टक्के टीडीएस कपात करणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता कोणताही टीडीएस कपात झाला नाही व बांधकामासाठी रक्कम अदा केल्याचा संशय आहे.