जळगाव : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारीच्या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षण काढण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यामुळे ३२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे गावगाड्यातील लढत रंगणार आहे.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर काही ग्रामपंचायतमधील कामकाज ठप्प असल्याने यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका गतकाळात घेण्यात आल्या होत्या. तशातच २ डिसेंबर २०२४ पर्यंत सर्व तहसीलदारांना गुगल अर्थच्या माध्यमातून सर्व गावाच्या नकाशाचे अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवकांनी अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा तयार केला होता. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उत्साहात पार पडल्या. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता स्थानिक पातळीवरील निवडणुकांचे वेध लागले आहेत.
पहिल्या टप्प्यात ३२ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाचे आरक्षण काढले जाणार आहे. दि.३० जानेवारी रोजी संबंधित तहसीलदार कार्यालयात आरक्षण सोडत काढण्याचे नियोजन प्रशासनाने हाती घेतले आहे. येत्या दोन दिवसात तसे आदेश पारीत होतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.