मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या पाच दिवसापासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल असलेला अभिनेता सैफ अली खान आज रुग्णालयातून उपचार घेवून घरी पोहचला आहे. गेल्या १६ जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. आरोपीने अभिनेत्यावर सहा वेळा हल्ला केला होता. अखेर आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान त्याला रुग्णालयातून घरी आणण्यासाठी आल्या होत्या. सैफ सहा दिवसांनंतर त्याच्या घरी परतला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्याला फक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या घटनेनंतर सैफ अली खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.
सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीच्या पहाटे त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान सैफ अली खानवर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. सैफ अली खानला सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, परंतु डॉक्टरांनी सैफला आणखी एक किंवा दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज त्याला घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली.
दरम्यान, सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळाला असला, तरी तो पूर्णपणे बरा झालेला नाही. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सैफ अली खान आता चालू आणि बोलू शकत असला तरी त्याच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी एक महिना लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.