मुंबई : वृत्तसंस्था
महायुतीमध्ये गेल्या दोन दिवसापासून पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आता महायुती सरकारवर टीकास्त्र सोडू लागले असतांना आता पवार गटाच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाले कि, पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही, तुम्हाला जनतेची कामे करून करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळ विस्तारासाठी बराच कालावधी गेला. त्यात पालकमंत्र्यांची नावे देखील उशिरा जाहीर झाली. यामुळे महायुतीत नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. आधी मंत्रीपदाचे खाते वाटप आणि नंतर पालकमंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीमधील नेत्यांचा वाद समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
राज्य सरकारने आता कामाला लागायला हवे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. किती गंभीर प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर आणि जनतेसमोर आहेत. यावर राज्य सरकार चर्चाच करत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. लोकांनी आपसात भांडण करण्यासाठी निवडून दिलेले नाही. तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी निवडून दिले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कोण कुठला पालकमंत्री? कोणता विभाग कोणाला मिळाला? ही काय घरची स्टोरी नाही. ही देशाची आणि राज्याची सेवा असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
राज्यातील जनतेचा गंभीरतेने विचार करा, असे म्हटणत सुप्रिया सुळे यांनी हात जोडून राज्य सरकारला शालजोडे मारले. पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे तुमचे घर नाही, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या माध्यमातून सुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे हे त्यांच्या मुळ गावी गेले असून पालकमंत्री पदांवर नाराजी असल्यामुळेच ते रुसले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.