बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटनेने चर्चेत येत असतांना नुकतेच बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सीसीटीव्ही फुटेज केज शहरातील विष्णू चाटे याच्या कार्यालयासमोरील दुकानाबाहेरील आहे. आवादा कंपनीला 29 नोव्हेंबर 2024 रोजी खंडणी मागितली होती. तत्पूर्वी विष्णू चाटे याच्या कार्यालयात बैठक झाली. त्याच दिवशीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांसह त्याचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील यावेळी आरोपींसोबत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.