अमरावती : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच अमरावतीमध्ये देखील सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावणारी एक भयानक घटना घडली होती. जादूटोण्याच्या संशयावरून 77 वर्षांच्या एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर तिला गरम सळीने चटके देण्यात आले,मिरचीची धुरी दिली. तोंडाला काळं फासून तिला लघवी पाजण्याचा प्रयत्न झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही तर गावकऱ्यांनी त्या महिलेच्या तोंडाला काळं फासून संपूर्ण गावात तिची धिंड काढून तिला गावातूनच हाकलण्यात आलं. गावचा पोलीस पाटीलच या धिंड काढण्यामागे असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता बाबू जामुनकर याची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर रोजी हा घृणास्पद प्रकार घडला होता, मात्र तो बराच उशीरा उघडकीस आला, त्यामुळे केवळ अमरावतीमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ माजली. पीडितेच्या मुलाने आणि सुनेने जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला पोलिसांत धाव घेतली आणि 30 डिसेंबरच्या या घटनेबद्दल तक्रार नोंदवली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास करण्यात आला. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली. याप्रकरणी त्यांनी 5 जानेवारी रोजी पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांची निराशा झाली होती. त्यांनी 17 जानेवारी, शुक्रवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही चिखलदरा तालुक्यातील रेठयाखेडा गावची रहिवासी आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलीस पाटीलच याच्या मागे असल्याचे समोर आल्यावर आता त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.