मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरु असतांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी संजय राऊत देखील सोबत होते. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात तसेच बीड आणि परभणी प्रकरणावरही चर्चा झाल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात पहिल्यांदाच भेट होत आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा होती. तसेच पुढील काही दिवसांत ही भेट होईल, असे शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर जाणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला होता. या घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचे समोर आले होते. हा विसंवाद मिटवायचा असेल, एकत्रितपणे पुढे जायचे असेल, तर अशाप्रकारच्या बैठका घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत समन्वय राखण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.