जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक नागरिक ऑनलाइनच्या नादात खिश्यात असलेल्या लाखो रुपयांची फसवणुकीचे प्रमाण नेहमीच उघडकीस येत असतांना आता पाचोरा तालुक्यातील एका ठेकेदाराला देखील असाच एक फटका बसला आहे. ऑनलाइन गेम खेळून भरघोस कमाई करा असे आमिष दाखवत शासकीय ठेकेदार रोशन पदमसिंग पाटील (वय २७, रा. पाचोरा, ता. जळगाव) यांची तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी दरम्यान घडला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबरपासून दोन जणांनी रोशन पाटील यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून एका वेबसाईटवरील ‘अंदर बाहर व ‘अंदर बाहर २’ हे गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकतात, असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून रोशन खेळले आणि ते जिंकल्याचे भासवून भामट्यांनी त्यांच्या बैंक खात्यात सात लाख रुपये जमा केले. त्यातून विश्वास संपादन केल्यावर ते वेळोवेळी हा ऑनलाइन गेम खेळत गेले आणि नेटबँकिंगद्वारे त्यांच्याकडून एकूण ७८ लाख ९० हजार ५०० रुपये स्वीकारण्यात आले. नंतर ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे मिळणे दूरच, उलट गुंतविलेली रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.