नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार असून नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पालकमंत्री जाहीर केल्याने शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरु झाले आहे तर काँग्रेस नेते, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणाघात केला आहे.
काँग्रेस नेते, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गरज संपल्यात जमा आहे. नाराजी दाखवून अधिकचे काही पदरात मिळेल का, हाच त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुळात शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे यांना संपवत एकनाथ शिंदेंना आणले आता शिंदेंना संपून नवीन’ उदय’ पुढे येईल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला आहे.
हा उदय म्हणजे उदय सामंत का? असे छेडले असता उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा चेहरा म्हणून तो तुम्हाला दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही, कारण काही उदय दोन्ही डब्यल्यावर हात मारून आहेत. संबंध चांगले ठेवले आहेत. ते उद्याच्या उदयासाठीच आहेत, यावर त्यांनी भर दिला.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या नाराजी बाबत बोलताना आता दुःख करून काहीही मिळणार नाही. एक एक ओबीसीचे मत घेऊन सत्तेवर आले. ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न भाजप पक्षात सुरू आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पहाटेच्या शपथविधी संदर्भात दादांनी जाऊ नये, असे आपण बोललो होतो, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच पक्षाच्या मेळाव्यात सांगितले. याबाबतही वडेट्टीवार यांनी चिमटा काढला. अंगावर आल्यावर सगळेच आठवते, त्यावेळेस का नाही आठवलं, पुढाकार कोणी घेतला, जाऊ नका आज काय सांगताय पुढे तुम्हीच गेले… दादासोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता.
महायुतीत भाजप ज्या पद्धतीने शिंदे बरोबर वागत आहे. त्यांचे मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून याची सुरुवात होईल. पहिले एकाला (शिंदे) आणि नंतर (पवार) बाजूला करून भाजपला राज्यात एकहाती सत्ता आणायची आहे, यावर भर दिला.