नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात घडलेल्या थरार घटनेची एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज सोमवारी (दि.२०) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला शनिवारी (दि.१८) दोषी ठरवले होते. त्याला आज सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) संजय रॉय याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तसेच पीडितेच्या पालकांच्या वकिलांनीदेखील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला शिक्षा सुनावली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी कोलकातामधील संपूर्ण सियालदाह न्यायालय परिसरात कडक पौलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषी संजय रॉय याला न्यायालयात आणणण्यात आले.
या खटल्याच्या ५७ दिवसांनंतर सियालदह अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयाने निकाल दिला. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेवरुन देशभर डॉक्टरांनी निर्देशने करुन संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक केली होती.
“या खटल्यातील मी सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले. युक्तिवादही ऐकले. हे सर्व पाहिल्यावर, मी तुला दोषी ठरवत आहे. तू दोषी आहेस. तुला शिक्षा झालीच पाहिजे,” असे न्यायाधीश न्यायाधीश अनिर्बान दास यांनी म्हटले होते. दरम्यान, नराधम संजय रॉयने न्यायाधीशांसमोर आपण गुन्हा केला नसल्याचा दावा केला. आरोपी संजय रॉयने न्यायाधीशांसमोर म्हटले की, “मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. मी असा गुन्हा केलेला नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सोडून दिले जात आहे. एका आयपीएसचा यात सहभाग आहे.” या प्रकरणातील दोषी संजय रॉयवर कलम ६४ (बलात्कार), कलम ६६ (मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिक्षा) आणि कलम १०३ (खून) अंतर्गत आरोप ठेवण्यात आला आहे.