महाकुंभनगर (प्रयागराज) : वृत्तसंस्था
देशातील महाकुंभमेळावा विविध कारणाने चर्चेत येत असतांना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाकुंभ मेळ्यात रविवारी भीषण आग लागली. त्यात 19 तंबू जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवळपास एक डझन बंबांनी एक तास लढून आग आटोक्यात आणली. भाविक आणि साधूंना सुरक्षितस्थळी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून आदित्यनाथ यांच्याकडून माहिती घेतली.
महाकुंभ मेळ्यात गॅसच्या दोन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे भषण आग लागली. वाहता वारा आणि राहुट्या व तंबूतील ज्वलनशील पदार्थ यामुळे आग वेगाने पसरली. लालबहादूर शास्त्री पुलाजवळील सेक्टर 19 मध्ये आगीचा प्रारंभ झाला. येथ्र गीता प्रेसचा तंबू आणि राहुट्या आहेत. त्याची झळ बाजूच्या जवळपास 10 तंबूंना बसली. त्यानंतर ही झळ त्यांच्या लगतच्या तंबूंना बसली. अग्निशामक दल आणि पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. महाकुंभमेळ्याचे पोलिस महासंचालक वैभव कृष्णा यांनी सांगितले की, जीवितहानी झाली नाही. मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची माहिती संकलित करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवणे आणि त्यांची सुरक्षितता याला प्राधान्य दिले आहे. घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या 15 बंबांनी आग आटोक्यात आणली. मुख्यमंत्री योगी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.