मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच शाहूवाडी तालुक्यातील चिखलवाडी येथे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एकाने स्वतःच्याच सावत्र मुलीवर तिला ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केला. यातून मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर शाहूवाडी पोलिसांत तिच्या बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम दत्तात्रय दळवी (वय 55) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःच्या सावत्र मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नराधम बापावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) नुसार शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येळवण जुगाई येथे धोंडीराम दळवी हा आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्याने दिवसा पीडित मुलीची आई कामाला गेली असताना आणि भाऊ बाहेर खेळायला गेला असताना तिला आणि तिच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली. या सावत्र मुलीवर रात्रीच्यावेळी लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने ‘पप्पा माझा छळ का करता? असा कोठे बाप असतो का?’ अशी विनवणी करूनही नराधम बापाने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आईला जीवे मारण्याची धमकी देऊन तो पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवत होता.
सहन न झाल्याने पीडित मुलीनेे ही घटना आपल्या आईला सांगितली. तिने अधिक चौकशी केल्यानंतर पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. याप्रकरणी स्वतः पीडित मुलीने शाहूवाडी पोलिसांत तक्रार दिली. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, सुहास रोकडे करीत आहेत.