मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई येथील दादर परिसरात हा अपघात झाला आहे. सुनील शिंदे यांच्या कारला बेस्ट बसची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सुनील शिंदे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात सुनील शिंदे यांना कुठलीही दुखापत झाली नाही.
या संदर्भातील अधिकची माहिती अशी, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे प्रभादेवी येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी ते दादर येथून पुढे जात असताना समोरून एक बेस्ट बस आली आणि समोरच्या बाजूने सुनील शिंदे यांच्या गाडीला धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या फॉर्च्यूनर कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात त्यांच्या गाडीच्या हेडलाईटचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात सुनील शिंदे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, या आपघातामुळे बेस्ट बस आपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काही आठवड्यापूर्वीच कुर्ला येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात जवळपास 8 जण ठार झाले होते तर 40 जण जखमी झाले होते. चालकाकडून ब्रेक ऐवजी एक्सीलेटरवरती पाय पडल्याने हा भीषण अपघात झाला होता. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ बेस्टच्या एका बसने एका व्यक्तीला चिरडेल होते, यात त्याचा मृत्यू झाला होता.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट आपघातांची माहिती काढली असता, यात गेल्या 5 वर्षात 834 बेस्ट बस अपघात झाले आहेत. यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचा समावेश आहे. बेस्टचे 352 अपघात घडले आहेत. यात जीवितहानीची संख्या 51 आहेत, तर खाजगी कंत्राटदारांच्या बसेसचे 482 अपघात झाले आहेत, यात 37 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्ष 2022-23 आणि वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक 21 जाणणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.