धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांकडून मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने धरणगाव नगर परिषदेने नियोजन करून प्रथमतः फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी अतिक्रमित फेरीवाल्यांना स्थलांतरीत केले. त्यामुळे मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
धरणगाव नगर परिषदेने गत १५ दिवसांपासून फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार नुकतेच नगर परिषदेने विशेष मोहीम राबवत सर्व फेरीवाल्यांना नियोजित ठिकाणी स्थलांतरित केले. या कारवाईमुळे मोकळा झालेल्या मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होवू नये यासाठी नगर परिषदेने विशेष पथक नियुक्त केले आहे. तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदे मार्फत करण्यात येत आहे. तर नगर परिषदेमार्फत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्लास्टिक पिशवी व कॅरीबॅगचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज पालिकेतर्फे प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली यामध्ये एकूण २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
अशीच मोहीम पालिका सातत्याने राबवणार असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या, कॅरीबॅगचा वापर टाळावा. तसेच उघड्यावर कुठेही कचरा टाकू नये, आपल्या दुकानाचा वा घराचा कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले आहे. आजची मोहीम मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक हेबतराव पाटील, रवींद्र गांगुर्डे व आरोग्य विभागातील सर्व मुकादम, सफाई कर्मचाऱ्यांनी राबवली