चाळीसगाव : प्रतिनिधी
धुळेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका इसमास कट मारल्याने त्याचा तोल जाऊन तो ट्रकच्या चालक बाजूकडील मागील चाकात आला. त्यात ट्रकचे चाक त्याच्या शरीरावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव ईश्वर सूळ (६३, तळेगाव, ता. चाळीसगाव) असे त्याचे नाव आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला ज्ञानदेव सूळ हे उभे असताना बस स्थानकाच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रक आला. हा ट्रक एवढा वेगात होता की, तो वळणावर वळवत असताना चालकाचा ताबा सुटला आणि तेवढ्यातच अचानक एका दुचाकीस वाचवत असताना ट्रकचा धक्का त्यांना लागला. त्यात त्यांच्या शरीरावरून एका बाजूने ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच जवळच असलेले सचिन जगन्नाथ मोरे, किरण वाघमोडे, ज्ञानेश्वर ढोणे यांनी हा ट्रक (एमएच ४१ एवाय २७७७) थांबविला व घटनेची पोलिसात कळवली.
पोलिसांनी ट्रकचालक समीर राजीव मुल्ला (सायगाव) यास माहिती ताब्यात घेतले. यास प्रकरणी मयताचा नातेवाईक योगेश भगवान मोरे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक तपास चाळीसगाव पोलिस करत आहेत. दरम्यान, या एकाच ठिकाणी गेल्या महिन्याभरातच अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाल्याच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या मुख्य चौकात पाच ते सहा पोलिस तैनात असूनही या घटना घडत असल्याने त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस तैनात करूनही जीवघेण्या अपघातांचे सत्र अद्यापही थांबले नसल्याने वाहनचालक याठिकाणाहून वाहन चालवताना जीव मुठीत धरून वाहन चालवत आहेत