भडगाव : प्रतिनिधी
शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्यास नागरिकांच्या सहाय्याने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी बाग परिसरातील रामकृष्णनगरमधील रहिवासी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह मुलीकडे बाहेरगावी गेले होते. आत्माराम पाटील यांचे घर बंद असल्याने प्रवीण संभाजी पाटील (३५, बाह्मणे, ता. एरंडोल), विभोर जुलाल जाधव (हिगोणे जवखेडे, एरंडोल) या दोघा चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे ३:१० वाजता बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या घरासमोरील रहिवासी संदीप भास्कर मराठे (मुकटीकर) यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी कॉलनीतील इतर रहिवाशांना जागृत करून हा प्रकार सांगितला. यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी दुचाकी (एमएच १९ डीए ८३८६) घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला. यावेळी संदीप मराठे यांनी पेठ चौफुलीवर थांबलेल्या आपल्या काही मित्रांना व पोलिस स्टेशनला हा प्रकार सांगितला.
यावेळी संदीप मराठे, हर्षल लालसिंग पाटील, रात्री गस्तीवर असलेले पोउनि किशोर पाटील, चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करून पेठ चौफुलीवर दोनपैकी प्रवीण संभाजी पाटील यास पकडले. दुसरा चोरटा विभोर हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, प्रवीण यास पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे