छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
देशभरात अनेक विद्यार्थी मोबाईलमध्ये जुगारच गेमच्या नादात काय करतील कुणीही सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे. बीसीएसचा विद्यार्थी प्रदीप निपटे याची मोबाईल गेमच्या जुगारात जिंकलेले पैसे हरल्याच्या वादातून त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मावस भावानेच निघृण हत्या केली. रूम पार्टनर येण्यापूर्वी चादरीने मृतदेह झाकून मृतदेहाशेजारी गेम खेळत बसला. संशय येऊ नये म्हणून पतंग खेळण्याच्या बहाण्याने निघून गेला. पुन्हा परत येऊन मृत झाल्याची खात्री केली.
सोशल मीडियावर मिस यूचे स्टेटस ठेवले. अत्यंत शांत डोक्याने त्याने प्रदीपची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (दि. १७) पत्रकार परिषदेत दिली. मारेकरी अल्पवयीन मावस भावाला सज्ञान समजावे, यासाठी जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रदीप निपटे (१९, रा. पिंपरखेड, ता. वडवणी, जि. बीड) हा अमर शिंदे, अभिषेक लव्हाळे, महेश चव्हाण आणि अल्पवयीन मावस भाऊ यांच्यासोबत उस्मानपुरा भागातील म्हाडा कॉलनीत एका फ्लॅटमध्ये राहत होता. प्रदीप आणि त्याचा अल्पवयीन मावस भाऊ दोघेही ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले होते. गेममध्ये जिंकलेल्या पैशातून दोघांमध्ये अनेकवेळा वादही झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून सोबतच राहत होते. दरम्यान, मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी (दि. १४) पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. अल्पवयीन मावस भावाने प्रदीपकडे त्याने ऑनलाईन गेमिंग जुगारात हरलेल्या पैशाची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये झटापट होऊन वाद झाला.
अल्पवयीन मावस भावाने रूमवर कोणी नसल्याचे पाहून थेट चाकूने १७ हून अधिक वार करून प्रदीपची निघृण हत्या केली. मृतदेह चादरीने झाकला. रक्ताने माखलेले कपडे बदलले. त्याचा मोबाईल घेऊन पतंग उडवायला जातोय, असे सांगून निघून गेला. मात्र, काही वेळाने प्रदीपच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी रूमवर तो परत येऊन गेला. त्यानंतर बचावासाठी त्याने अत्यंत शांत डोक्याने प्लनिंग केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास निरीक्षक अतुल येरमे करत आहेत.