बीड : वृत्तसंस्था
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहे. तर राजकीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. अशातच धनंजय मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सारंगी महाजन यांनी मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबीयांची विचारपूस करत प्रकरणावर चर्चा केली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यायला हवा असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
सारंगी महाजन म्हणाल्या की, माझ्या केसमध्ये देखील गोविंद मुंडेंचे वाल्मीक कराड याच्याशी संबंध आहेत आणि त्याचे धनंजय मुंडेसोबत आहे. म्हणजे यात धनंजय मुंडे यात मिक्स आहे. पंकजा पण तेवढीच सहभागी आहे. हे टोळभैरव बीडला बिहारसारखे खराब करत आहे. या लोकांनी हवेत राहू नये. त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी.
सारंगी महाजन म्हणाल्या की, परळी ही वाल्मीक कराडसाठी बंद नव्हती तर कराडचे माणसं राडा करतील आपले नुकसान करतील म्हणून लोकांनी दुकानं बंद ठेवली. लोकांना तो मध्ये गेला यांचा आनंद आहे. धनंजय मुंडेंलाही आत घाला आणि सरकारी जेवण जेवू द्या.
सारंगी महाजन म्हणाल्या की, अजित पवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतीत योग्यवेळी निर्णय घेतील. माझ्या बाबतीत त्यांनी न्याय मिळून देण्याची खात्री दिली आहे. धनंजय मुंडेंनी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा.
धनंजय मुंडेंनी स्वत:ची दहशत संपवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असा सल्ला मी त्याला देणार आहे. सामान्य जनतेने त्यांचे सर्व व्यवहार बाहेर काढले पाहिजे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंडे बहिण-भावाने संगनमताने धमक्या देत कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी सारंगी महाजन यांनी केला होता. यानंतर आता त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आहे.