धरणगाव प्रतिनिधी । शहरातील मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनने विद्यार्थिनींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत पालकत्वाची जबाबदारी पार पाडून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन विद्यार्थिनींच्या पालकांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले होते. अशा अवेळी मायेचे छत्र हरवल्यामुळे या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी संस्थेचे अध्यक्ष जीवनसिंह बयस पुढे सरसावले आणि या विद्यार्थिनींच्या पदवीपर्यंत च्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेमार्फत स्वीकारली. यापैकी एक विद्यार्थिनी स्वाती अरुण बिसेन हिचे लग्न ठरले असतांना जिवनसिंह बयस यांनी सदर मुलीला लग्नाप्रीत्यर्थ सोनसाखळी भेट स्वरूपात देऊन लग्नापर्यंतचे पालकत्वाचे उत्तरदायित्व पार पाडले.
उपक्रमामुळे सर्वत्र अभिनंदन
या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाजातील अनेक मान्यवर व सुजाण नागरिकांकडून स्तुतीपर उद्गार निघत आहेत. संस्थेमार्फत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप, गावातील अनेक शाळांमधील गरजू व होतकरू विद्यार्थांना दत्तक घेऊन त्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च, गावातील बालाजी मंदिराचे जीर्णोद्धार प्रमुख म्हणून जबाबदारी, जवळजवळ ५० निराधारांना नियमितपणे घरपोच डबा पोहच करणे असे लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. संस्थेला एटीजी प्रमाणपत्र प्राप्त झाले असून देणगीदार व्यक्तींना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे कारण त्यांच्या पैशांचा योग्य पध्दतीने उपयोग संस्थेच्या माध्यमातून होणार आहे.
यांची होती उपस्थिती
आजच्या कार्यक्रम प्रसंगी मुन्नादेवी अँड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष जिवनसिंग बयस, तेजेंद्रसिंह चंदेल, धिरेंद्रसिंह पुरभे, गोविंद जनकवार, निलेश बयस आदी पदाधिकारी उपस्थित होते.