नागपूर : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर आता राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद रंगला होता त्यावर आता पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताकदिनापूर्वी सुटलेला असेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
यापूर्वी त्यांनी 16 ते 18 जानेवारी दरम्यान पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल, असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार मध्यंतरी नसल्याने काहीसा विलंब झाला. तिघांमध्ये समन्वयाने हा प्रश्न सुटेल, असे सांगितले होते. आता त्यांनीच पुन्हा 26 जानेवारी ही नवी तारीख दिली आहे. नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यकाळ संपत असल्याने आज शुक्रवारी त्यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
निवडणुकीचा आणि या बैठकीचा काहीही संबंध नाही. मार्च महिन्यात अर्थसंकल्पात काय योजना, काय अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने ही बैठक होती, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. दरम्यान, निवडणूक कधी घ्यायची हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा आहे. मात्र, दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी आम्ही सत्तारुढ पक्षामार्फत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि आमच्या दोन-तीन बैठका पालकमंत्रीपद संदर्भात झाल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करतील, असा दावा त्यांनी केला.