पुणे : वृत्तसंस्था
पुणे-नाशिक महामार्गवर मुक्ताई धाब्याजवळ आळेफाटाकडून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाची पुढे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या एसटी बसवर आदळून भीषण अपघात होऊन यात ९ जण ठार झाले. यासह इतर ६ जणांवर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची ही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात शुक्रवारी (दि. १७) सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
दरम्यान घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार घटनास्थळी पोहचले. तसेच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व भाजपा तालुका अध्यक्ष संतोश खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत समजले माहिती अशी की, मुक्ताई धाब्याजवळ एसटी बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी होती. या एसटीवर प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो प्रवासी वाहतूक गाडी जोरात आदळली. या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला मागून येणाऱ्या आयषर टेम्पोने जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान आयशर टेम्पो चालकाने टेम्पो नारायणगाव पोलीस स्टेशनचसमोर सोडून दिला व तो पसार झाला. अपघातात एकूण सात जण जागेवर ठार झाले, तर दोघेजण उपचारादरम्यान ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतामध्ये एक दोन वर्षाचे बालक देखील असल्याचे समजते. तसेच एकूण मृतांपैकी सहा जण खेड तालुक्यातील असल्याचे समजते. तसेच उर्वरित मयत हे पिंपळवंडी वडगाव कांदळी आणि नारायणगाव परिसरातील असल्याचे समजते. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.