जळगाव : प्रतिनिधी
विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने कांतीलाल श्रीराम सपकाळे (वय ३५, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता हरिविठ्ठल नगरात घडली. या मारहाणीत लोखंडी झारा तरुणाच्या डोक्यात मारल्याने, तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरातील भाई गल्लीत कांतीलाल सपकाळे हा युवक राहतो. बुधवारी सकाळी ९ वाजता कांतीलाल यांची आई या गटार घाण काढत असताना, त्यावेळी महेंद्र भोई हा त्यांना विनाकारण शिवीगाळ करीत होता.
यावेळी कांतीलालने शिवीगाळ का करता असे विचारले असता, महेंद्र भोई याने घरातून लोखंडी झारा घेऊन येत त्याने कांतीलालच्या डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. कांतीलाल यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागला उपचारानंतर कांतीलाल सपकाळे याच्या तक्रारीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.