मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड प्रकरणी आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या प्रयत्न करीत असताना बीड प्रकरणात फडणवीस यांना अधिक कठोरपणे वागता आले असते. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली. हे ढोंग आहे. बीडमध्ये बंदुकीचे राज्य होते. शिवाय लोकांना हालहाल करून मारण्यात आले. उत्तर प्रदेश आणि बिहारात अतीक अहमदसारखे गुन्हेगार याच पद्धतीने वागत व त्यांना राजकीय आश्रय होता. अतीक अहमदची हत्या झाली. बीडमध्ये अतीक अहमदपेक्षा भयंकर लोक राजकीय कृपेने धिंगाणा घालीत आहेत. एका कराडला ‘मोक्का’ लावून हा धिंगाणा कायमचा संपणार नाही. खरा नाग अद्याप बिळातच असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
दैनिक सामना मधील अग्रलेख देखील वाचा….
पंतप्रधान मोदी हे बुधवारी महाराष्ट्रात होते. त्याच वेळी बीड जिल्ह्यातील परळीत हिंसाचार आणि पेटवापेटवी सुरू होती. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे राज्य सुरू आहे याची ही झलक आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून बीड आणि परभणी या जिल्ह्यात खदखद आहे. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी व केजमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनांनंतर लोकांच्या भावनांचा बांध फुटला हे मान्य, पण बुधवारी संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होऊन त्यास ‘मोक्का’खाली जेरबंद करताच कराडचे समर्थक म्हणवून घेणाऱ्यांनी परळीत हैदोस घातला. बाजार बंद केले. गाड्यांवर दगडफेक केली. जाळपोळ घडवून रस्ते बंद केले. परळीत जमावबंदी असतानाही हा धुडगूस चालू राहिला हे काय कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण मानायचे? संतोष देशमुखला न्याय मिळावा म्हणून आधी आंदोलन झाले व आता त्या खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडला न्याय मिळावा म्हणून त्याचे समर्थक रस्त्यावर उतरले. बीड जिल्ह्याचे राजकीय व सामाजिक गणित बिघडले आहे आणि त्याचे परिणाम मराठवाडय़ाच्या समाजमनावर होण्याची भीती आम्हाला वाटते.
उत्तर प्रदेशातील संभल येथे मशीद खोदकाम प्रकरणात वातावरण पेटले व पोलिसांनी गोळीबार केला. पुढचे दहा दिवस संभल प्रकरण देशातील मीडियाने लावून धरले. कारण तेथे हिंदू-मुसलमान असा विषय झाला, पण संभलपेक्षा बीड आणि परभणीचे हत्याकांड गंभीर आहे व त्या हत्याकांडांवर पांघरुण घालण्याचा, मुख्य आरोपींना वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न झाला. सरकार वाल्मीकला वाचवायचा प्रयत्न करीत राहिले व देशमुखांची पोरंबाळं, भाऊ, पत्नी जनतेच्या पाठिंब्याने लढत राहिली. हा रेटा असा ताकदीचा की, शेवटी वाल्मीकवर 302 चा गुन्हा दाखल करावा लागला. लोकांच्या शक्तीचा हा विजय आहे. मात्र यापुढे केज, परळीत शांतता नांदायला हवी. वाल्मीक व त्यांचे लोक आत आहेत आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रवृत्ती बाहेर तडफडत आहेत. बीडमध्ये शांतता नांदायला हवी व त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. कराड समर्थक जमावबंदीच्या काळात धुडगूस घालत असतील तर पोलिसांनी ही टगेगिरी बंद पाडायला हवी. कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही हे कृतीतून दिसायला हवे. संतोष देशमुख प्रकरणात सरकारचे पुरते हसे झाले. हा एक खून पचवता आला नाही व त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीचा पेटारा उघडला.
खंडण्या, अपहरण, बलात्कार, लूटमार असा एक ‘मिर्झापुरी’ सिनेमा गेल्या काही वर्षांपासून बीडच्या भूमीवर सुरू होता व यातील सर्व प्रमुख पात्रे ही भाजपच्या दिग्दर्शनाखाली काम करीत होती. ‘‘सरकार आपले आहे. काल ‘सागर’ बंगल्यावर व आता ‘वर्षा’ बंगल्यावर आपल्याला वाचवणारा बॉस बसलाय’’ हे जेव्हा गुन्हेगारांना वाटू लागते तेव्हा त्यांची कायद्याबद्दलची भीती संपून जाते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी राजकीय फायद्यासाठी जे पेरले तेच उगवले, पण बीडमध्ये ते जरा जास्तच तरारले. राजकारणात साधनशूचिता व नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पक्षाचा हा असा ‘रानबाजार’ झाला आहे. हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बदौली यांना बलात्कार व गँगरेपच्या आरोपाखाली अटक झाली आहे. हे महाशय पंतप्रधान मोदींच्या अंतःस्थ गोटातले खासमखास आहेत. त्यांनी स्वतःबरोबर भाजपचे चरित्रच उघडे केले. त्यामुळे भाजपने इतरांना नैतिकतेचे धडे देणे बंद केले पाहिजे. भाजपच्या मागे जनतेचे पाठबळ नाही. त्यांचा विजय बनावट आहे व ईव्हीएम घोटाळा करून भाजप विजयी झाला. लोकांना मोदी किंवा भाजपचा विचार मान्य आहे म्हणून त्यांना भरभरून मतदान झालेले नाही.