मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खंडणी अन् हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात दिले होते. त्यावेळी वाल्मीक कराड हा देशमुख हत्या प्रकरणात आरोपी नव्हता. पण आता त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, मकोकातील तरतुदी व मुख्यमंत्र्यांचे आदेश यामुळे त्याच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची अनेक ठिकाणी एकत्र जमीन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत या दोघांच्या जमिनीचा सामायिक सातबाराच X वर पोस्ट केला. त्यात जवळपास 88 एकर जमीन मुंडे-कराड यांच्या नावावर असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र, त्यात वाल्मीक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल त्यावेळी अंजली दमानियांनी केला. बीड जिल्ह्यातच अनेक ठिकाणी घरातील काम करणाऱ्या व्यक्तीपासून तर वॉचमनच्या नावावर जमीनीचे 20 ते 25 एकरचे तुकडे आहेत अशी चर्चा आहे.
वाल्मीक कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याचे समोर आले आहे. ही गुंतवणूक वाल्मीकने एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले असून या महिलेचे नाव ज्योती जाधव असे आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या इयमरातीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली. या इमारतीत ऑफिस नंबर 610 सी हे अपार्टमेंट असून त्यात 45.71 चौ.मी कार्पेट एरिया एवढ्या जागेचे आलिशान ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे या ऑफिसला बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे.
वाल्मीकचे दुसरे ऑफिस नंबर 611 बी या अपार्टमेंटमध्ये असून त्याचे कार्पेट एरिया 54.51 चौ.मी एवढे आहे. यात देखील पार्किंगची सुविधाआहे. हा एकूण 25 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की या महिलेचा वाल्मीक कराडशी काय संबंध आहे? या प्रकरणात ईडीकडून चौकशी होऊ शकते.
कराडने कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली, त्याची देश-विदेशात किती संपत्ती आहे हे शोधण्यासाठी पोलिस कोठडी हवी आहे.ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा व हत्येतील त्याचा सहभाग जाणून घेण्यासाठी 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली होती. सरकारी वकील जितेंद्र शिंदे व आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली.