मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यात आता राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली आहे. शिवाय राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत अनिवार्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शालेय विभागाची बैठक झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले, सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, केंद्रीय शिक्षण पद्धतीच्या गरजेनुसार अवलंब केला जाईल. चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार आओण करत आहोत, पुढच्या टप्प्यात सीबीएससी पॅटर्नच्या काही चांगल्या बाबी आपण शाळांमध्ये घेऊ, असे दादा भुसे यांनी म्हटले. सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होईल, असेही दादा भुसे यांनी नमूद केले. राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीतापाठोपाठ राज्यगीत म्हणणे अनिवार्य असल्याचेही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. परिपाठावेळी राज्यगीत म्हणणण्याचा नियम आहे, परंतु राज्यातील अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत लावणे सक्तीचे असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असल्याचेही भुसे यांनी सांगितले.