नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून आसाराम महाराज यांना अटक झाल्यानंतर जामीन मिळत नव्हता तर आता राजस्थान उच्च न्यायलयाने मंगळवारी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला ३१ मार्चपर्यंत तात्पुरता सशर्त जामीन दिला. त्यानंतर जोधपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आसारामची रात्री उशिरा सुटका झाली.
एक आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी ३१ मार्चपर्यंत जामीन दिला होता. त्यानंतर आसाराम यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात शिक्षा निलंबित करण्यासंबंधी याचिका दाखल केली होती. न्या.दिनेश मेहता आणि न्या.विनीतकुमार माथूर यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील समानता पाहून आसारामला तात्पुरता जामीन मंजूर केला. आसारामचा जामीन सर्वोच्च न्यायालयातील ७ जानेवारी रोजीच्या निर्धारित अटी-शर्तीनुसारच आहे. एप्रिल २०१८ मध्ये आसारामला जोधपूर आश्रमात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.आता ११ वर्षांनंतर प्रथमच तुरुंगातून बाहेर आले आहेत.