जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडी येथील सिताराम शंभू रेसीडेन्सी या अपार्टमेंटमधील तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याठिकाणाहून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी येथील शिवनगरात सिताराम शंभू रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये रविंद्र जगन्नाथ मगरे (वय ४८) हे वास्तव्यास असून त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये त्यांच्या घराच्या खाली समोरासमोर राजेश सिताराम पाली व भगवान बाबूराव माळी हे वास्तव्यास आहे. सोमवार दि. १३ जानेवारी रोजी सायंकाळी मगरे हे बाहेर गावाहून घरी आले असता, त्यांना अपार्टमेंटच्या खाली गर्दी असल्याचे दिसले. त्यांनी संबंधितांना विचारपूस केली असता, त्यांना सौरभ उपाध्याय यांनी सायंकाळ असल्याने जिन्यावरील लाईट चालू करुन ते खाली उतरत असतांना त्यांना मगरे यांच्या घराचा कडीकोयंडा कापलेला दिसून आला. त्यानंतर ते खालच्या मजल्यावर आल्यानंतर त्यांना राजेश पाली व भगवान माळी यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तुटलेल दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्याचे सांगितल्यानंतर रविंद्र मगरे यांनी लागलीच घरी जावून पाहणी केली. यावेळी त्यांना बेडरुममधील गोदरेजच्या कपाटाचे लॉक तुटलेले होते आणि त्यातून २ लाख १७ हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी अपार्टमेंटच्या आजूबाजूच्या आजू परिसरासह महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.