जामनेर : प्रतिनिधी
डंपर व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील भुसावळ रोडवरील कांग नदीच्या पुलावर १३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून डंपरचा चालक फरार झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, टाटा कंपनीचे डंपर (एमएच १२. व्हीबी ८६७७) हे जामनेर कडून भुसावळकडे तर हिरो स्पेलंडर कंपनीची दुचाकी (एमएच-४८ बीएस- २३७५) ही भुसावळ कडून जामनेरकडे येत होती. हे दोन्ही वाहने कांग नदीच्या पुलावर आल्यावर त्यांच्यात अपघात झाला. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ ठप्प होवून वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्ते संदीप हिवाळे, आरोग्यदूत गणेश चौधरी, जालमसिंग राजपूत आदींनी उपजिल्हा रुग्णालयात आणले.
परंतु, तेथे रूग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, शहरातील कमल फाउंडेशनच्या रूग्णवाहिकेतून गंभीर जखमीला जळगाव येथे रवाना करण्यात आले. या अपघातात डोक्याला गंभीर जखमी झालेला हा व्यक्ती अजिंठा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. तर कांग नदीवर नवीन पुल बांधण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून संथ गतीने सुरू असून ते काम त्वरित पुर्ण करावे, अशी मागणी यानिमित्त केली जात आहे