मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून आता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नवीन नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्र संघटनेत शेंड्यापासून बुडापर्यंत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणी काँग्रेस नेतृत्वाने नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी एका नव्या सर्वमान्य चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव अग्रस्थानी आहे. याशिवाय पक्षाचे तरुण नेते सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह यशोमती ठाकूर यांचेही नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पूर्णतः वाताहत झाली. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 16 जागा आल्या. यामुळे धक्का बसलेल्या काँग्रेसने आता आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल करण्याचे संकेत दिलेत. या अंतर्गत सर्वप्रथम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी एखाद्या नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
काँग्रेस नेतृत्वाने या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारणा केली आहे. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्रात ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा आहे. त्यांचे महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी चांगले संबंध आहेत. एवढेच नाही तर गांधी कुटुंबीयांशी असणारी जवळीक व प्रसंगी रोखठोक मत व्यक्त करणे ही त्यांची जमेची बाजू असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार व यशोमती ठाकूर या नेत्यांची नावेही या प्रकरणी चर्चेत आहेत. यात यशोमती ठाकूर यांच्या नावावरही गांभिर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. ठाकूर यांची या पदावर निवड झाली तर अनेक वर्षांनी महाराष्ट्र काँग्रेसला एखाद्या महिलेचा चेहरा मिळेल.