जळगाव प्रतिनिधी ।/ जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता समुदाय आधारीत शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की देशात 52 टक्के शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) योजना आधारवड ठरणार आहे. निर्यातक्षम केळी घड व्यवस्थापनासाठी अनुदानित तत्वावर योजना राबविण्यासाठी 7 कोटीचा प्रस्तावास शासनाची लवकरच मंजुरी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांची मोठी हानी होत असते. यामुळे शेतकर्यांनी कृषी उत्पादनांवर प्रक्रियेकडे मोठ्या प्रमाणात वळावे, जेणेकरून त्यांना कृषी मालाचा मोबदला चांगला मिळू शकतो. तसेच शेतकऱ्यांनी नवतंत्राचा स्वीकार करून शास्वत शेतीसाठी गट शेतीचा अवलंब करावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शेती हा सर्वात मोठा दवाखाना असून यातून सर्वांना आरोग्य प्राप्त होत असते. आणि शेतकऱ्यांना शासकीय पातळीवरून सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज स्मार्ट योजनेच्या अंतर्गत समुदाय आधारित शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, आ.राजुमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे , आत्माचे उपप्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी, यांच्यासह कृषी खात्याचे व नाबार्डचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी कंपन्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अभिजित राऊत , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, पंकज आशिया व मान्यवरांच्या हस्ते स्मार्ट प्रकल्प माहिती पुस्तिका , तणांचे औषधी गुणधर्म, तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग घडी पत्रिकेचे विमोचन करून प्रकाशन करण्यात आले. या पुस्तीकांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्वक सूत्रसंचालन प्रकल्प विशेषज्ञ संजय पवार यांनी केले आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.