चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील देवळी येथील एका प्रौढावर तलवार व चाकूने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्यात एक अल्पवयीन असल्याने त्याची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आहे. चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अशोक रघुनाथ गायकवाड (६०) हे ४ जानेवारीला रात्री ११:३० वाजता घरात झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधून घरात मागील दरवाजाने प्रवेश केला. या दोघांनी अशोक गायकवाड यांच्यावर तलवार व चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. यात त्यांच्या डोक्याला अन् दोन्ही गाल व हाताला गंभीर इजा झाली होती.
अशोक गायकवाड यांना यामुळे त्यांचा डावा हात गमवावा लागला आहे. याबाबत जखमी अशोक गायकवाड यांची स्नुषा बेबाबाई चंदर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सूचनेनुसार सपोनि प्रवीण दातरे, पोउनि सुहास आव्हाड, विकास शिरोळे, पोहेकों गोकुळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, अशोक राठोड, पोकों विनोद बेलदार, संजय लाटे, नीलेश लोहार, भूषण बाविस्कर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला.
याप्रकरणी देवळी येथील सागर राजू गायकवाड (२४) यास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा गुन्हा त्याने एका अल्पवयीन मुलासह केल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे त्या मुलास ताब्यात घेतल्यानंतर त्याचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु, तो अल्पवयीन असल्याने त्यास जळगावच्या बालगृहात रवाना करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यातील तलवार व चाकू हस्तगत करण्यात आला आहे.