जळगाव : प्रतिनिधी
कपडे खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक एकमेकांकडे बोलविण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी होऊन दगड, काठीने एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात दोन्ही बाजूंकडील व्यावसायिकांना दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. ११) टॉवर चौक परिसरातील काँग्रेस भवनसमोर घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, व्यावसायिक सतीश चंद्रप्रकाश भैरवानी (३१, रा. न्यू बी. जे. मार्केट परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काँग्रेस भवनसमोरील जैन मंदिरानजीक त्यांच्या हातगाडीच्या शेजारी असलेल्या अशोक रमेश माळी यांच्या हातगाडीसमोरील ग्राहक कपडे घेण्यासाठी त्यांच्याकडे आले असताना माळी याच्यासह त्याचा भाचा व बहीण तेथे आले व त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. तसेच मारहाण करीत मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी सतीश यांचे वडील चंद्रप्रकाश भैरवानी हे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत असताना अशोक माळी याने सतीश यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली.
याप्रकरणी भैरवानी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अशोक माळी याच्यासह त्याचा भाचा व बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक माळी यांनी दिलेल्या शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सतीश भैरवानी, त्याचा भाचा, वडील चंद्रप्रकाश भैरवानी व बहीण, अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे