मुक्ताईनगर : प्रतिनिधी
कांद्याची रोपं आणण्यास गेलेल्या पती-पत्नीच्या मोटारसायकलला अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटारसायकल स्वार वृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी रणथम फाट्यानजीक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेड येथील निना ज्ञानदेव नारखेडे (वय ६५) व सुनीता निना नारखेडे (५९) हे पूर्णाकाठावरील दूधलगाव येथे साडूभावाकडे कांद्याचे रोप घेण्यासाठी गेले होते. परतीच्या मार्गाने रुईखेड येथे घराकडे जाताना रणथम फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, त्यात दोघे पती- पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, महामार्गावर भरधाव वाहने नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या वाहनधारकांमुळे मात्र अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याची दखल घेत महामार्ग पोलिसांनी अशा सुसाट वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच नियमित पणे तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.